Autism spectrum disorder.(ASD) (स्वमग्नता)

आजपर्यंत मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना समुपदेशन करत असताना एक गोष्ट जाणवली कि सध्या मानसिक आरोग्याबाबत जागृती लोकांमध्ये व्हायला लागली आहे. मानसिक आरोग्याबाबत समस्या जाणवायला लागली तर लोक उपचारासाठी पुढे यायला लागली आहेत, जरी हे प्रमाण अजून वाढणे आवश्यक असले तरी निदान लोकांमध्ये याची जाणीव होतेय हि खूप समाधानाची बाब आहे.
ज्याप्रमाणे प्रौढ लोकांमध्ये मानसिक अस्वस्थता जाणवते, समस्या येतात त्याचप्रमाणे लहान मुलांमध्येसुद्धा अशा समस्या जाणवतच असतात. मात्र त्या वेळीच ओळखल्या आणि त्यावर व्यवस्थित उपचार घेतले तर पुढे येणाऱ्या समस्यांची तीव्रता आपण कमी करू शकतो. उपचाराचा प्रभाव जास्त आढळून येतो. मात्र सामान्यतः जनमानसात अशी समजूत असते कि लहान मुलांमध्ये कसल्या आल्या आहेत समस्या! त्यांना कसलं आलं आहे डीप्रेशन असे. डीप्रेशन असो वा आणखी काही परंतु त्यानाही वेगवेगळ्या समस्या जाणवत असतात/ जाणवू शकतात हि सत्यता आपण नाकारू शकत नाही.
आत्ता सध्या बऱ्याच मुलांमध्ये ऑटीझम हा मनोविकार मोठ्याप्रमाणावर दिसून यायला लागला आहे. या लेखामध्ये autism spectrum disorder मांडणार आहे, हे मांडण्याचे कारण म्हणजे ऑटीझम हि सर्वात वेगाने वाढत जाणारी एक वैकासिक विकृती आहे आणि या आजार बाबत प्रत्येकाला माहिती असण आवश्यक आहे.
सद्यस्थितीमध्ये लहान मुलांमध्ये जाणवण्याइतका आढळणारा आजार म्हणजे ASD म्हणजेच (Autism Spectrum disorder). आज जर autism spectrum disorder च प्रमाण पाहिलं तर ६४ मध्ये एका व्यक्तीमध्ये हा आजार असल्याच आढळून येत. मुलींपेक्षा मुलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसतो. जर १८९ मुलींपैकी मध्ये एका मुलीमध्ये हा आजार दिसून येत असेल तर हे प्रमाण ४२ मध्ये एका मुलामध्ये आढळून येत. लहान मुलांमध्ये या आजाराची लक्षणे सर्वप्रथम त्यांच्या पालकांना वयाच्या पहिल्या तीन वर्षांमध्येच दिसून येतात . मात्र तो डायग्नोझ मात्र वय वर्षे ३ नंतरच केला जाऊ शकतो. जन्मापासून जरी हा आजार असला तरी बाल्यावस्थेमध्ये हा आजार ओळखणे वा त्याचे निदान करणे कठीण असते. आजाराचे निदान लवकरात लवकर झाले, अन योग्य वेळी यावर उपचार होऊ शकले तर इतरांशी संवाद साधण्याची त्यांची क्षमतेमध्ये सुधारणा होण्यात व त्यांच्या वाढी मध्ये मदत होते.
जर आठवत असेल, तर साधारण १० वर्षांपूर्वी झी टी. व्ही. वर ‘आप कि अंतरा’ नावाची एक मालिका सुरु झाली होती ज्यामध्ये autism झालेल्या एका छोट्या मुलीची गोष्ट दाखवली होती. ती जर पाहिली असेल तर autism म्हणजे काय याचा साधारणतः अंदाज येतो.
तस पाहिलं तर autism spectrum disorder हि एक गंभीर अशी Neuro devlopmental disorder आहे. आता neuro developmental disorder म्हणजे काय ? तर मेंदू किंवा मध्यवर्ती चेतासंस्था ( Central nervous system) यांच्या वाढ आणि विकासामध्ये असणारी कमतरता. या आजाराम व्यक्तीच्या भावना , अध्ययन क्षमता , स्व नियंत्रण आणि स्मृती यांच्यावर परिणाम होतो . स्वतःच्या भावना ते व्यक्त करू शकत नाहीत, म्हणजेच साधारणतः या आजारात व्यक्तला हावभावातून संवाद साधण्यात समस्या येतात. इतरांच्या भावनाही समजून घेऊ शकत नाहीत. या व्यक्ती नजरेला नजर देऊन बोलू शकत नाहीत. थोडक्यात कुटुंबातील व्यक्ती कुटुंबाबाहेरील लोकांशी संवाद साधण्यात आणि नातेसंबंध प्रस्थापित करण्यात अडचणी येतात .शाब्दिक आणि हावभावातून संवाद साधण्यात समस्या येतात – म्हणजेच बोलणे शिकण्यात होणारा उशीर, संवादामध्ये सहभागी होण्यात व सुरु करण्यात येणारी समस्या , तसेच संवादात सातत्य ठेवणेही त्यांना कठीण जाते. साचेबंद पद्धतीने आणि पुन्हा पुन्हा तेच तेच बोलणे अशा अडचणी येतात . कोणत्याही कृतीचा त्यांना अर्थ समजत नाही. नित्यदिनक्रमा मध्ये त्यांना सारखेपणा लागततो , साचेबंद अन त्याचं त्याचं प्रकारचे वर्तन ( टाळ्या वाजवणे , शरीर हलवणे ) अशा प्रकारची लक्षणे त्यांच्या मध्ये जाणवतात .
ऑटीझम मध्ये बालकांमध्ये पुढील ३ व्यच्छेदक लक्षणे म्हणजे
१. भाषा कौशल्याचा विकास न होणे
२. सामाजिक कौशल्ये जसे कि लोकांशी जुळवून घेणे, त्यांच्या भावना त्यांच्या हावभावान वरून समजून घेता येणे व त्यानुसार संभाषण करता येणे.
३. एकाच प्रकारच्या, अर्थशून्य हालचाली वारंवार होत राहणे.
autism असणाऱ्या प्रौढ व्यक्ती स्वतःचे आयुष्य नोकरी करून स्वतंत्रपणे जगू शकतात. साधारणतः ३३% लोक थोड्या प्रमाणामध्ये का होईना स्वतंत्रपणे जगण्यात यशस्वी होतात. काही लोक ज्यांची कमी बुद्धीमत्ता असते अन जे बोलण्यात सक्षम नसतात अशांना जास्त प्रमाणात मदतीची आवश्यकता असते.
या आजारांना अनेक घटक कारणीभूत असतात , जसे- अनुवांशिक घटक ( Genetic factors), पर्यावरणात्मक घटक( Environmental factors), मानस शास्त्रीय घटक( Psychological factors), आणि चेतापेशीय घटक (Neurological factors)
अनेक शास्त्रज्ञांच्या मते ASD होण्यासाठी बालकाला पालकांकडून मिळणारी गुणसूत्रे कारणीभूत असतात. ज्यामुळे हा आजार अनुवांशिक कारणामुळेच झालेला आढळून येतो.
परंतु काही शास्त्रज्ञांच्या मते केवळ कोणत्याही ठराविक गुणसुत्रांमुळे हा आजार उद्भवत नाही, तर काही पर्यावरणात्मक घटकही याला कारणीभूत असतात . म्हणजेच ASD होण्यासाठी पूरक असणाऱ्या घटकांसोबतच जरी बालकाचा जन्म झाला असला तरी परिस्थितीमुळे हा आजार वाढतो. काहींच्या मते ३५ आठवड्यांपूर्वी झालेल्या बाळंतपणामुळे, गरोदरपणात आईने केलेले मद्यसेवन वा काही औषधांच्या सेवनामुळे ( Sodium valporate) हा आजार वाढतो.
अनेक शास्त्रज्ञ असे म्हणतात कि ASD च्या मागे एक संकल्पना आहे जिला TOM ( theory Of Mind ) अस म्हणतात. theory of mind म्हणजे काय तर समोरच्या व्यक्तीची मानसिकता ओळखण्याची व्यक्तीची असणारी क्षमता होय. थोडक्यात काय इतरांच्या नजरेतून जगाकडे पाहण्याची क्षमता .
यामध्ये अस दिसून येते सामान्य मुलांमध्ये वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत TOM ची चांगली समज विकसित झालेली असते , मात्र ASD झालेल्या मुलांमध्ये TOM ची समज मर्यादित असते वा समज अजिबात नसते .
या आजाराचा व्यक्ती/ बालकाच्या आयुष्यावर, त्याच्या कुटुंबावर परिणाम होत असलेला दिसून येतो . म्हणजेच आपल्या आजूबाजूला काय घडतेय ते समजण्यात अडचणी जाणवतात. पुढे काय घडू शकेल याचा अंदाज बांधू शकत नाहीत . अशा मुलाचं सामाजिकीकरण (socialization) होऊ शकत नाही, थोडक्यात ते सामान्य आयुष्य जगू शकत नाहीत. हे झाले बालकावर होणारे व्यक्तिगत परिणाम. त्याच्या आजाराचा त्याच्या कुटुंबावर पण परिणाम होत असतो. या आजारा सह एखाद्या व्यक्तीला सांभाळणे हे साधी गोष्ट नसते. सामाजिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक, अशा सर्व पातळ्यांवर त्यांना सतत प्रशिक्षण द्याव लागत.
या आजाराच्या उपचारासाठी खालील उपचार पद्धती वापरण्यात येतात.
१. Occupational Therapy- या उपचार पद्धतीमध्ये व्यक्ती जितक्या जास्तीत जास्त स्वावलंबी होऊ शकेल अशी कौशल्ये शिकवण्यावर भर दिला जातो. उदाहरणार्थ – कस जेवावं , स्वतःच कस आवराव, अंघोळ कशी करावी, इतर लोकांमध्ये कस रहाव.
२ . Sensory Integration Therapy- या आजारामध्ये व्यक्तीला संवेदानिक घटकांचा त्रास होत असतो. म्हणजेच सामान्य व्यक्तींना संवेदना जशा समजू शकतात, तशा यांना समजत नाहीत. पंचज्ञानेंद्रियांनी होणाऱ्या संवेदनांचा जसे आवाज , स्पर्श, वास, चव , प्रकाश यांचा त्यांना अर्थ लावता येत नाही, त्यामुळे त्यांना त्याचा त्रास होतो . आणि त्यांना ते खूप वेगळ्या अन विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देतात .
त्यामुळे Sensory Integration therapy द्वारे अशा संवेदानिक घटकाचा सामना कसा करावा ते शिकवलं जात.
३. Speech therapy- and audiometry –
याद्वारे व्यक्तीचे संवाद कौशल्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जातो. काही लोक शाब्दिक संवाद कौशल्य शिकु शकतात , पण काहीना ते अवघड जाते त्यामुळे हावभाव, चित्रे यांचा वापर करून शिकवले जाते.
संवाद कौशल्ये वाढवण्यासाठी आणखी एका पद्धतीचा वापर केंला जातो , ते म्हणजे PECS ( the Picture exchange Communication System ) – यात संवाद कौशल्ये विकसित करण्यासाठी काही चित्रांचा वापर करण्यात येतो. म्हणजे संवाद वाढवण्यासाठी प्रश्न आणि उत्तरांचा समावेश केला जातो.
याच बरोबर अनेक वेगवेगळ्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत.जसे Auditory training, discrete trial training, Music therapy, anti- yeast therapy, Vitamin therapy, occupational therapy, physical therapy , facilitated therapy, Sensory integration etc.
आपल्याच घरात आपल्या मुलाला हा आजार झाला आहे हे ऐकण आणि या पुढच आपल आयुष्य विचार केला होता त्यापेक्षा खूप वेगळ असणार आहे याची जेव्हा जाणीव होते त्यावेळी परिस्थिती खूप कठीण होते. दैनंदिन जीवन तितकस सोप राहत नाही. कारण या मुलांना रोज खूप वेगवेगळ्या अडचणींना सामोर जाव लागत. अन अशा आजारांसाठी आपण आधीपासूनच तयार नसतो. या आजारांबाबत माहित होत त्यावेळी कुटुंबातील व्यक्तींना सुद्धा खूप वेगवेगळ्या भावनिक अनुभवांना सामोर जाव लागत, आपल्या मुलाला हा आजार असूच शकत नाही पासून आजार आहे तर त्यासाठी मी काय करू शकेल या विचारांपर्यंत येताना ते खालील पायर्यांच्या माध्यमातून पोचतात . सर्वात आधी जेव्हा हा आजार समजतो तेव्हा बसतो तो धक्का , कारण याची कधीच अपेक्षा केलेई नसते. अचानक समोर आलेली परिस्थिती मान्य नसते , त्यासाठी आपले मन तयार नसते.मग हे अमान्य करून second opinion साठी दुसर्या डॉक्टर कडे जाण्याची तयारी दाखवतो. त्यानंतर जी भावना अनुभवायला मिळते ती म्हणजे दुःख. पण या दुखामुळेच राग वाढत जातो आणि तो वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर पडतो . पण हे सर्व होत असताना परिस्थिती व्यक्तीला अमान्य असते , कारण आपल्या मुला बाबत असे काही घडू शकते हेच मुळात आपण नाकारतो. त्याचसोबत येणारा एकाकीपणा , यालापण अनेक कारणे कारणीभूत असतात . जसे अशा परिस्थितीत आपण कुणाशी बोलाव , आपल्या जवळच्या लोकांशी मनातील भावना व्यक्त कराव्यात अस वाटत नाही, कारण आपल्याला कुणी समजून घेईल वा कुणाचा आपणास पाठींबा मिळेल याबाबत खात्री वाटत नाही . आणि सर्वात महत्वाच म्हणजे स्वीकारार्हता – जर आपण आहे ती परिस्थिती स्वीकारली, मुलाचा आजार स्वीकारला याचाच अर्थ आपण आपल्या मुलाचा आजार हाताळण्यास समर्थ आहोत, अथवा अस म्हणू शकतो कि आपण तो व्यवस्थितपणे हाताळू शकतो.
त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये संयम राखण खूप महत्वाच आहे. कारण आपल्या मुलाचा आजार आणि त्याचा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर होणारा परिणाम समजण्यास वेळ लागतो.
ऑटीझम असणाऱ्या मुलांना आयुष्य जगण्यात अशा मर्यादा येत असल्या तरी त्यांच्यात एक साकारात्मक बाजू सुद्धा आहे. ती म्हणजे अशा प्रत्येक मुलामध्ये काही न काही अस कौशल्य असत जे इतर सामान्य मुलांपेक्षा त्यांना वेगळ बनवत. त्यांच्या अश्या लक्षवेधी क्षमतेमुळे त्यानं “Idiot Savant” असे म्हंटले जाते. याचा अर्थ निर्बुद्ध जाणकार आणि त्या कौशल्याच्या आधारावर ते त्याचं आयुष्य व्यवस्थित जगू शकतात. आता उदाहरणच द्यायचं झाल तर वर ‘’ आप कि अंतरा ‘’ बद्दल सांगितलय, त्या मालिकेतील अंतरामध्येसुद्धा कितीही अंकी अंक गणित क्षणात करण्याच कौशल्य दाखवल आहे, काहीना गणिताबद्दल असे, काहीना संगीतच असेल वा अजून दुसर्या गोष्टीबद्दल असू शकत . अशा लोकांना हे मिळालेलं एक वरदानच असत, ज्याच्या जोरावर ते आयुष्य व्यवस्थितरित्या तारून नेऊ शकतात. पालक आणि सजग व्यक्ती म्हणून आपण या आगळ्या वेगळ्या ऑटीस्टीक व्यक्तींच्या नजरेतून जगाकडे पाहून एक वेगळा अनुभव घेऊ शकतो. त्यांच्यासोबत एक वेगळं पण चांगलं आयुष्य जगू शकतो.

Priyanka Pardeshi


Counsellor & psychotherapist
priyankapardeshi1609@gmail.com

Design a site like this with WordPress.com
Get started